मुंबई : २४६ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवार, १० नोव्हेंबरला नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ६६४ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.
इच्छूक उमेदवारांनी आताच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी व आपला लॉगइन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा. कारण संपूर्ण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र भरण्यासाठी ते आवश्यक आहेत. आताच ऑनालाइन नोंदणी करून ठेवल्यास ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल.
नामनिर्देशनपत्रांतील आणि शपथपत्रांतील संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रिंटआऊटवर सही करून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे सुलभ होईल. संकेतस्थळावरील ऑनलाईन माहिती मात्र १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत भरता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अपील नसलेल्या प्रकरणांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे. अपील असलेल्या प्रकरणांमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
निवडणुकांमध्ये २४६ नगर परिषद, ४२ नगर पंचायतींमधील एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ नगराध्यक्षांची निवड २ डिसेंबर रोजी ईव्हीएमद्वारे मतदान करून करण्यात येईल. तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
१.०७ कोटी मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. राजकीय पक्ष सध्या आपापल्या आघाड्या आणि स्वतंत्रपणे किंवा एकत्रितरीत्या लढविण्यात येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या संख्येचा निर्णय अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
नगर परिषद म्हणजे लहान शहरी भागांसाठीची स्थानिक स्वराज्य संस्था असून ती स्थानिक प्रशासन आणि शहरी विकासाची जबाबदारी पार पाडते. नगर पंचायत ही ग्रामीण भागातून शहरी स्वरूपाकडे संक्रमण होत असलेल्या १२ हजार ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठीची स्थानिक स्वराज्य संस्था असते.
विभागनिहाय नगर परिषद व नगर पंचायत :
कोकण विभाग : २७
नाशिक : ४९
पुणे : ६०
छत्रपती संभाजीनगर : ५२
अमरावती : ४५
नागपूर : ५५