महाराष्ट्र

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

महाराष्ट्रात निवडणूक मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झालेला दिसून येत आहे. या समस्येवर यापूर्वीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधी पक्षानंतर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्याच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर होईपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

नेहा जाधव - तांबे

महाराष्ट्रात निवडणूक मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झालेला दिसून येत आहे. या समस्येवर यापूर्वीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त आणि अधिकारी यांची भेट घेऊन संबधित त्रुटी दूर केल्यावरच निवडणूका घेण्याची विनंती केली. आता विरोधी पक्षानंतर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्याच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर होईपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला की, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच गंगापूर विधानसभा क्षेत्रात तब्बल ३६,००० मतदारांची नावे दुप्पट नोंदवली गेली आहेत.

शनिवारी (दि. १८) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तडजोड आणि फेरफार करण्यात आले आहेत. एका मतदाराचे नाव दोनदा किंवा तीनदा दिसत आहे. काही प्रकरणांमध्ये तर १३ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अजूनही यादीत आहेत. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

काही मतदारांचे घर क्रमांक शून्य

चव्हाण यांनी उदाहरण देत सांगितले की, “गंगापूरच्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट मतदारांची नोंद झाली आहे. एका सरपंचाचे नाव तीन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये दिसते. इतकेच नव्हे तर काही मतदारांच्या घरांच्या पत्त्यांमध्ये ‘घर क्रमांक - 0’ असे नमूद आहे, तर काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या गल्ल्यांचे क्रमांक यादीत आहेत. रांजणगावमधील गांधीनगर परिसरातील गल्ली क्रमांक १२३ ही प्रत्यक्षात नाही, मात्र त्या पत्त्यावर शेकडो मतदार दाखल आहेत. हे अत्यंत संशयास्पद आहे.”

त्यांनी सांगितले की, “फक्त रांजणगाव सर्कलमध्येच ४,००० पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदले गेले आहेत. यामध्ये अनेकांच्या पत्त्यावर माजी सरपंचाचा एकच पत्ता नमूद असल्याचंही दिसतं.”

त्रुटी दुरुस्त न केल्यास न्यायालयात जाऊ

या सगळ्या गोंधळाची चौकशी करून जबाबदार बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मतदार याद्या योग्यरीत्या दुरुस्त न झाल्यास आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. निवडणूक आयोगाने आपलं काम पार पाडलं नाही, तर न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक ठरेल.”

विरोधकांकडूनही चिंता व्यक्त

राज्यातील मतदार याद्यांतील कथित अनियमिततेबद्दल महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन तक्रारी मांडल्या होत्या.

निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील दोन महिन्यांत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. मात्र, मतदार याद्यांतील विसंगती आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' अनावश्यक; ७९ (अ) अंतर्गत मुरलेल्या भ्रष्टाचाराला उच्च न्यायालयाचा सुरुंग

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'

पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा

IND vs AUS : रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून