राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा

राज्यातील हवामानात येत्या काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता असून, १७ ते २० मार्च या चार दिवसांच्या कालावधीत मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

Swapnil S

पुणे : राज्यातील हवामानात येत्या काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता असून, १७ ते २० मार्च या चार दिवसांच्या कालावधीत मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या संभाव्य पावसाचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दिसून येईल. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान बदलाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पावसासोबतच गारपीट होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या मुख्य बदलापूर्वी १३ आणि १४ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र झाली असून अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असून, पुढील दोन दिवसांत या भागात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो. प्रदूषणामुळे सकाळी काही भागात धुक्याचा थर दिसत असला तरी त्यापासून धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, देशाच्या अन्य भागांचा विचार करता, दिल्लीत हलका पाऊस तर जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये मात्र तीव्र उष्णतेच्या लाटा कायम राहतील.

रब्बीची पिके काढणीच्या टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांसाठी नियमावली जाहीर

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तातडीची नियमावली जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ती पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्रीने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे सातत्याने लक्ष देऊनच शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालय आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा