महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारपासून पुढील चार दिवसांसाठी काही भागांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यांसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबई आणि पुणेकरांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतही यलो अलर्ट आहे. या भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे, तसेच ६ सेंमी ते ११ सेंमी पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या भागांत ११ सेंमी ते २० सेंमी पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि ५०–६० किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की २१ मेपासून महाराष्ट्र व गोवाच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हा पट्टा २४ मेपर्यंत उत्तर दिशेने तीव्र होऊ शकतो. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी यामुळे २२ ते २४ मेदरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरच्या समुद्र खवळलेला असणार आहे. खोल समुद्रात जोरदार वारे वाहतील.
मच्छिमारांसाठी सतर्कतेचा इशारा
हवामानातील या बदलांचा विचार करता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्र खवळणार असल्याने त्यांनी हवामानाची सतत माहिती घेत राहावी आणि समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.