मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्यापही महायुतीला सरकार स्थापन करता आले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेली चढाओढ थांबून आता भाजपकडेच सर्वाधिकार आले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आता मंत्रीपद मिळवून घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. अनेक टर्म आमदारकी भूषवलेले नेते आता मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.
भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे अनेक आमदार मुंबईत ठाण मांडून आहेत. मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी आपापल्या मर्जीतील आमदारांना घेऊन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला जात आहे. मात्र, खुद्द एकनाथ शिंदे यांनीच आपल्या पक्षातील नेत्यांना आता मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघात जाऊन काम करा, असा धमकीवजा सल्ला दिला आहे. महायुतीत मंत्रीपद भूषवलेल्या काही नेत्यांना यावेळी डावलले जाण्याची शक्यता असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, नुकत्याच विसर्जित झालेल्या सरकारमधील काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या वाट्याला मंत्रीपद येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिंदे सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही त्यांना मंत्रिपदाचे स्वप्न साकारता आले नाही. विधानसभेच्या तोंडावर त्यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मात्र या दोघांनी आता आपल्याला मंत्रीपद पाहिजे, असा तगादा एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला आहे. एकीकडे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपद तसेच महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या वाटाघाटी सुरू असून पक्षातीलच नेत्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांना आता जेरीस आणले आहे. पक्षातील नेत्यांच्या आग्रहामुळे एकनाथ शिंदे चांगलेच कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्याऐवजी नेत्यांची मनधरणी करण्यात शिंदे यांचा वेळ वाया जात आहे.
त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्वच आमदारांना मुंबईत थांबण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात जाऊन काम सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये थांबले आहेत. आता शिंदे यांच्या सूचनेनुसार तेथील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.