माळशेज घाट ‘न्यायाच्या’ प्रतीक्षेत! दोन हजार कोटींचा खर्च…तरीही अपघातांची मालिका कायम संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

माळशेज घाट ‘न्यायाच्या’ प्रतीक्षेत! दोन हजार कोटींचा खर्च…तरीही अपघातांची मालिका कायम

म्हारळ - मुरबाड -टोकावडा-माळशेज घाट-खुबी या मार्गाच्या उन्नतीसाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात माळशेज घाटातील मूलभूत समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. त्यामुळे हा घाट आजही अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून, स्थानिक तसेच पर्यटकांकडून घाटाला ‘न्याय’ मिळण्याची मागणी जोर धरत आहे.

नामदेव शेलार

मुरबाड : म्हारळ - मुरबाड -टोकावडा-माळशेज घाट-खुबी या मार्गाच्या उन्नतीसाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात माळशेज घाटातील मूलभूत समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. त्यामुळे हा घाट आजही अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून, स्थानिक तसेच पर्यटकांकडून घाटाला ‘न्याय’ मिळण्याची मागणी जोर धरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाड-माळशेज घाट रस्ता धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याचे दुपदरीकरण सुरू असले, तरी घाटातील सर्वात महत्त्वाचा भाग अरुंद रस्ता आजही तसाच आहे. दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक जीव जातात. या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र रुंदीकरण न झाल्याने अपघात सुरूच आहेत.

सध्या मुरबाड-सरळगाव-टोकावडा-थीदवीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु वाहनचालक आणि प्रवासी यांची प्रमुख मागणी म्हणजे माळशेज घाटात दुपदरी रस्ता करणे, वनविभाग व पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेऊन घाटातून बोगदा काढणे, हा बोगदा जुन्नरच्या खुबी गावाशी जोडणे आदी कामे करणे गरजेचे आहे. माळशेज घाटातील खोल दरीलगतच्या संरक्षण भिंती अनेक ठिकाणी खचल्या आहेत. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जवळपास दहा वर्षांपूर्वी एसटी बस दरीत कोसळून २८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच दरड कोसळणे, धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणे, अवघड वळणे यामुळे शेकडो अपघात घडले आहेत.

रुंद रस्ता करण्याची मागणी

हा मार्ग पुणे-नगर-जुन्नर-आळेफाटा-ओतूर-पंढरपूर-जेजुरी-शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांचा दुवा आहे. तसेच भीमाशंकर, अजबळेवाडी, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने घाटावरील भार प्रचंड आहे.थीदवी गावाजवळून उड्डाणपूल काढून, तो थेट हनुमान मंदिराजवळील बोगद्याशी जोडल्यास वाहतूककोंडी आणि अपघात मोठ्या प्रमाणात टाळता येतील, असा आवाज स्थानिकांकडून उठतो आहे. याच बोगद्यापासून खुबी गावापर्यंत समृद्धी महामार्गासारखा रुंद रस्ता उभारण्याची मागणीही जोर धरत आहे

'बॉम्बे'वरून मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका; "काहीजण आपल्या मुलांना..."

शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, पर्यवेक्षकांनाही महत्त्वाचा आदेश

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज