मालवण/मुंबई : मालवण शहरातील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात प्रवेश करत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पैशाचे घबाड सापडल्यानंतर मालवण शहरांतच नव्हे तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राणे कुटुंबातील या संघर्षामुळे महायुतीही अडचणीत सापडली आहे.
हे पैसे मतदारांना वाटण्यासाठीच आले आणि ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच आणले, असा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काही कोटी रुपये आणण्यात आले आणि त्याचे जिल्ह्यात वाटपही झाले, असाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, निलेश राणे यांनी काल हे ऑपरेशन 'सोशल मीडिया', आणि 'फेसबुक 'वर लाईव्ह करत निवडणूक यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेची अक्षरश: झोप उडवून दिली. जिल्ह्यात मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत अशा चार ठिकाणी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा पद्धतीचे 'स्टिंग ऑपरेशन' निलेश राणे यांनी केल्याने राजकीय वातावरण बरेच तापले आहे.
मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात प्रवेश करत हे 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरात भाजपचे कुडाळ शहरातील पदाधिकारी बंड्या सावंत तसेच एक वाहनचालक व केनवडेकर यांचे कुटुंबीय होते. राणे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये पलंगावर नोटांच्या बंडला असलेली एक पिशवी दिसली. त्यानी लगेचच ही बाब पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणेच्या नजरेस आणली. त्यानंतर रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांनी पैशाने भरलेली ही बॅग ताब्यात घेतली. त्याचबरोबर एक डायरीसुद्धा ताब्यात घेतल्याचे समजते.
'आपण एक व्यावसायिक असून हे पैसे धंद्यातले आहेत,' असे सांगण्याचा प्रयत्न केनवडेकर यांनी करताच हे पैसे कुठून आले, कशासाठी आले, याची शहानिशा संबंधित यंत्रणा करतील, असे निलेश राणे यांनी त्यांना सांगितले. केनवडेकर यांच्या घरात पैशाच्या आणखीही बॅगा आहेत, शिवाय शहरातील भाजपच्या आणखी चार-पाच स्थानिक नेत्यांच्या घरातही पैसे लपवून ठेवल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
अशा पद्धतीने पैशाचे वाटप करून जर निवडणुका जिंकल्या आणि ही मंडळी सत्तेवर आली तर नगरपरिषद लुटूनच खातील. शहराचा विकास कसा होईल, असा सवाल त्यांनी केला आहे.
आरोप बिनबुडाचे - सावंत
आमदार निलेश राणे यांनी केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे असून निवडणुकीचे वातावरण पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणूनच असे छोटे-मोठे विषय करून बदनामी करण्याचे काम आता त्यांनी सुरू केले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे.
वैभव नाईक यांचा आरोप
गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हेच केनवडेकर प्रचार प्रमुख होते आणि या काळात प्रत्येक मतदाराला ५ ते १० हजार रुपये वाटण्यात आले. आता तर शिंदे सेना त्याहून अधिक रक्कम वाटत आहे, असा आरोप 'उबाठा 'सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
मला २ तारखेपर्यंत युती टिकवायचीय - रवींद्र चव्हाण
शिंदे सेना व भाजपमधील संघर्ष सध्या वाढला असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक अत्यंत सूचक आणि स्फोटक विधान केले आहे. ‘निलेश राणे यांचे आरोप खोटे आहेत. मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काहीच बोलणार नाही,’ असे वक्तव्य चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानामुळे निवडणुकीनंतर महायुतीत मोठा भूकंप होणार की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.
‘स्टिंग ऑपरेशन’वर बावनकुळेंची शंका
सिंधुदुर्गमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी मतदारांना वाटपासाठी ठेवलेल्या कथित रोख रकमेच्या जप्ती प्रकरणात काही गैरकृत्य आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाईस आपला पाठिंबा असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, शिवसेना आमदार निलेश राणेंनी कार्यकर्त्याच्या घरी घुसून केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या पद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हमाम में सब नंगे होते हैं - नितेश राणे
मंत्री आणि भाजप नेते नितेश राणेंनीही आपल्या मोठ्या भावाने केलेले आरोप फेटाळून लावले. भाजप कार्यकर्त्यांवर लागू होणारे निकष इतरांनाही लागू व्हावेत, असे ते म्हणाले. ‘हमाम में सब नंगे होते हैं,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.