महाराष्ट्र

...तर मराठे तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणतील; पंकजा, धनंजय मुंडे यांना जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा दिला. आपल्याशी पंगा घेतल्यास मराठा समाज तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणेल, असे जरांगे म्हणाले.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांना निर्वाणीचा इशारा दिला. आपल्याशी पंगा घेतल्यास मराठा समाज तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणेल, असे जरांगे म्हणाले.

ओबीसींच्या ताटातून काढून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, ओबीसी समाजाची आधीच उपासमार सुरू आहे, असे पंकजा मुंडे यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यावरून जरांगे यांनी वरील इशारा दिला. राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्याशी पंगा घेऊ नका, तुमची राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही, अद्याप वेळ गेलेली नाही, लवकर शहाणे व्हा, असा इशारा आपण दोघांनाही देत असल्याचे जरांगे म्हणाले.

हैदराबाद गॅझेट वापरून कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या नेत्यांवर आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर जरांगे यांनी थेट हल्ला चढवला आहे. 'हैदराबाद गॅझेट' गुलामीचे आहे, असे म्हणणाऱ्या नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

तर तुमचे आरक्षण कशावर

जरांगे-पाटील यांनी आक्षेप घेणाऱ्या नेत्यांना प्रतिप्रश्न केला की, हैदराबाद गॅझेट गुलामीचे आहे, असे तुम्ही म्हणता. मग तुमचे आरक्षण कोणते आहे, तुम्ही इंग्रजांच्या जनगणनेद्वारेच आरक्षण घेतले ना. त्यांनी स्पष्ट केले की, कायदा आणि संविधान कोणाच्या सांगण्यावरून चालत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील चांगल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत का, असा सवाल करत, त्यांनी निजाम आणि मुघलांना पळवून लावणारे मराठे आपला चांगला इतिहास का घेऊ शकत नाहीत, असे विचारले.

विरोधकांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा इशारा

यापुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आता जो मराठ्याच्या विरोधात जाईल, तो नेता राजकारणातून संपवायचा, हे पक्क केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आपले लक्ष्य ओबीसी समाज किंवा एखादी जात नाही, तर ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचे आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मागे जो कोणी नेता जाईल, त्याच्या निवडणुकीतील जागा पाडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, एखाद्या मतदारसंघात ८-१० हजार मतदान असलेल्या जातींच्या मागे धावण्याची गरज नाही.

मुंडेंचे हात रक्ताने माखलेले

जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. महाजन आणि मुंडे हे घराणे पूर्वी नावाजलेले होते. पण या 'अकडू बुद्धीच्या' लोकांनी पैसा, गुंडगिरी, माज आणि धुंदी डोक्यात चढवून लोकनेते पदवी मिळवलेल्या साहेबांचे (गोपीनाथ मुंडे) नावही खराब करण्याचे काम केले. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचे (महादेव मुंडे आणि संतोष देशमुख) गंभीर आरोप करत, त्यांचे हात रक्ताने भरले असल्याचा दावा केला.हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले, आज तेच आरक्षणाला विरोध करतात, असे म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडेंना "माझ्या नादाला लागू नका, मराठ्यांकडे बघितले तर राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन, असा थेट इशारा दिला.

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन