महाराष्ट्र

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाडा, जो नेहमी दुष्काळ आणि पाण्याअभावी त्रस्त असतो, तिथे यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, गावोगावी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेहा जाधव - तांबे

मराठवाडा, जो नेहमी दुष्काळ आणि पाण्याअभावी त्रस्त असतो, तिथे यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, गावोगावी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेतून पाणी पोहोचवला जाणारा हा भाग आता हेलिकॉप्टर, एनडीआरएफ आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे. आतापर्यंतच्या मुसळधार पावसामुळे ८ जणांचा बळी गेला असून, हजारो नागरिक बेघर झाले आहेत.

धाराशीव, बीड, जालना - सर्वाधिक फटका

धाराशीव जिल्ह्यात अनेक घरांत पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आला. आंबी गावात कुटुंबाच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबेनात. घरात चिखल, भांडी-कुंडी सर्वच वाहून गेली, धान्याचे पोते नष्ट झाले. जालन्यातील दुधना परिसरात सोयाबीन, मका, ऊस जमीनदोस्त झाला. तर बीडच्या माजलगाव तालुक्यात शेतं अक्षरशः तळ्यांत बदलली आहेत. गोदावरीच्या पुरामुळे सादोळा, पोहनेर आणि अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे.

लातूर, परभणी आणि हिंगोलीत हाहाकार

लातूर जिल्ह्यात हातातलं पीक वाहून गेलं. निलंग्यात महिलेनं 'सरकार मदत करा' असा आर्त टाहो फोडला. बैल, कोंबड्या, जनावरं पुराच्या पाण्यात अडकून वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परभणीत दुधना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. हिंगोली जिल्ह्यात आसना नदीच्या बॅकवॉटरमुळे शेतातली हळद, सोयाबीन आणि कापूस चिखलाखाली गाडला गेला.

धरणांचे दरवाजे उघडले; लष्कर-एनडीआरएफ तैनात

मांजरा धरण १०० टक्के भरल्याने एकाचवेळी १२ दरवाजांतून विसर्ग सोडावा लागला. ५५ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडल्याने बीड, लातूर आणि कर्नाटकातील बिदरपर्यंत १५० हून अधिक गावांवर संकट आलं. अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं असून, कैज तालुक्यात १५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. माजलगाव व नाथ सागर धरणातून विसर्ग वाढल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर खाली आलं आणि गावांचा संपर्क तुटला.

नागरिकांची सुटका, तरीही हतबलता कायम

एनडीआरएफच्या जवानांनी बीडच्या सांडस चिंचोली गावात एका गर्भवती महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केलं. शिरसमार्ग गाव सिंदफणा नदीने वेढल्याने पूर्णपणे संपर्कातून तुटलं. प्रशासनाच्या मदतीसोबतच स्थानिक समाजही पुढे सरसावला. अनेक गावांत चप्पूवरून गर्भवती महिलांना व आजारी व्यक्तींना सुरक्षितस्थळी आणण्यात आलं.

राजकीय हालचाली आणि मदतीची आश्वासने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून, ३१ लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा निर्णय जाहीर केला. मात्र ‘ओला दुष्काळ जाहीर होणार का?’ या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आपल्या सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बळीराजा हताश

दुष्काळाला सरावलेला शेतकरी यंदा अतिवृष्टीने हादरला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती, त्यांचं पीक पाण्यात गाडलं गेलं. गावोगावी महिलांचे आक्रोश, घरातल्या चिखलाचे साम्राज्य आणि शेतीत पाण्याचे डोह या दृश्यांनी मराठवाड्याची दयनीय अवस्था स्पष्ट दिसते. मराठवाड्यातला हा पाऊस आता वरदान नसून संकट ठरत आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली