मुंबई : गद्दारी करून इकडे तिकडे पळून गेले, त्यावेळी गद्दारांनी मोठ्या विश्वासाने साथ दिली. मात्र महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात गद्दारांना ना राज्यपालपद ना मंत्रिपद, गरज असताना राज्यपाल, मंत्रिपदाचे चॉकलेट दाखवले आणि वेळ मारून नेल्यावर महामंडळाच्या खुर्चीत बसवले, असा सणसणीत टोला शिवसेना आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांना लगावला.
शिवसेनेच्या काळात नावारूपाला आले, पद खुर्ची दिली ती शिवसेनेने, मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करत शिंदेंनी ३३ आमदारांना सुरत गुवाहाटीला पळून नेले. त्यावेळी ३३ गद्दारांना खुर्चीचे आमिष दाखवले. त्यानंतर संबंधित गद्दारांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार आज, उद्या होईल. असे सांगत गद्दारांना लटकवत ठेवले. सरकारची राजवट संपत आली, तरी मंत्रिपद काही मिळाले नाही. तर आता या गद्दारांना महामंडळांच्या अध्यक्षपदी महायुतीकडून बसवण्यात आले आहे, अशा शब्दांत ‘एक्स’वर पोस्ट करीत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
‘भाजपला तरी काय मिळालं?’
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले. गद्दारांना मंडळे दिली जात असताना भाजपला काय मिळाले?, असा सवाल करीत हे घडत असताना भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक वाटते, असेही ते म्हणाले. दोन वर्षांत आमचे सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठल्या खऱ्या भाजप कार्यकर्त्यांला काय मिळाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.