ST ला पांडुरंग पावला! ९.२४ लाखांहून अधिक भाविकांचा एसटीने पंढरपूर प्रवास, ५,५०० एसटी बसच्या २१,५२७ फेऱ्या संग्रहित फोटो
महाराष्ट्र

ST ला पांडुरंग पावला! ९.२४ लाखांहून अधिक भाविकांचा एसटीने पंढरपूर प्रवास, ५,५०० एसटी बसच्या २१,५२७ फेऱ्या

विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही राज्याची 'लालपरी' विश्वासाची सोबती ठरली.

Swapnil S

मुंबई : विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही राज्याची 'लालपरी' विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडविला. यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. त्यामुळे म्हणावे लागेल. एसटीला विठ्ठल पावला, असेच

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे. आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन हे अवाढव्य नियोजन करण्यात आले होते. प्रवाशांची मोठी मागणी आणि वाहतुकीची आव्हाने असतानाही चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून एसटीने वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत केला. या यात्रेदरम्यान पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभही देण्यात आला.

लाखो भाविकांना पंढरपूरला सुरक्षित नेणे आणि पुन्हा घरी पोहोचवणे ही केवळ सार्वजनिक वाहतूक सेवा नसून ती 'श्री विठ्ठलाची सेवा' आहे, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला. एसटी कुटुंबासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांनी यापुढेही 'प्रवासी देवो भव' या भावनेने प्रत्येक प्रवाशाला सेवा देण्याचे आवाहन केले.

आषाढी वारी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून लाखो भाविक पंढरपूरला जातात. एसटी महामंडळासाठी ही वर्षातील सर्वात मोठी वाहतूक मोहीम मानली जाते. यंदा मिळालेला वाढीव महसूल हा मोठ्या सण-उत्सवांच्या काळात राज्य परिवहन सेवेवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शवतो.

आकडेवारी

  • ९.२४ लाख भाविकांचा प्रवास

  • ५,५०० बसेसच्या २१,५२७फेऱ्या

  • ४१.१८ कोटींचा महसूल जमा

  • गेल्या वर्षीपेक्षा ५.३० कोटींचे अधिक उत्पन्न

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल