उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण तसेच पुणे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Swapnil S

मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण तसेच पुणे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी खंडाळ्याच्या घाटात रस्ते व रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने मुंबई व पुणे दरम्यानची रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाली. राज्यभरात सोमवारी दिवसभरात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये १३ ठार झाले, तर ४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बुधवार, ८ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत महिन्याभराच्या सरासरीचा पाऊस केवळ चार दिवसांत झाला आहे. तर वैतरणा नदी धोक्याच्या पातळीवर असून नदी काठावरील गावांमध्ये या नदीच्या पुराचे पाणी घुसले. जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना रस्ते मार्गे काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे व पालघरमधील शाळांना मंगळवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नदी-नाले तुडुंब

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील वैतरणा, तानसा, सूर्या, देहेरजा, पिंजाळ या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मानखुर्दची 'ती' इमारत अवैध; दोघांना अटक

मानखुर्दमध्ये रविवारी जी इमारत कोसळली ती बेकायदेशीर होती. बेकायदेशीर इमारत पडल्याने त्या इमारतीतील लोक नाही तर ती ज्या झोपडीवर पडली त्यातील लोक मेले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने ५ निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४२५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू

राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०७० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिक ०९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवर देखील थेट संपर्क साधू शकतात. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

विरोधकांनी विधानसभेत सरकारला विचारला जाब

मुंबईसह राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षांनी पावसाळ्यातील दुर्घटनांवरून आणि मृत्यूप्रकरणांवरून सरकारला जाब विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी निसर्गाच्या माध्यमातून तयार झालेली ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे सांगत मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वरंधा घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ ते आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने त्या पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने मंडणगड -म्हाप्रळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

भिवंडीत मुलगा गेला वाहून; अहिल्यानगरात शॉक लागून चिमुकली ठार

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात १३ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून अहिल्यानगरमध्ये विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत आपल्या मित्रांबरोबर नाल्याशेजारी खेळायला गेलेला मुलगा पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांकडून हा मुलगा नाल्यात वाहून बेपत्ता झाल्याचे समजातच परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी तात्काळ धाव घेत प्रशासनाला संपर्क साधला. मोहम्मद अबुजर अन्सारी असे नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रियंका गांगर्डे असे मृत चिमुरडीचे नाव आहे. अहिल्यानगरमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यातच विद्युत खांबात वीजप्रवाह उतरल्याने त्याच खांबाला स्पर्श होऊन प्रियंकाचा मृत्यू झाला.

वारकऱ्यांनी आळंदी, देहूत येऊ नये...

आळंदीत सोमवार सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. नंतर मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचले आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मंगळवार आणि बुधवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याने आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाट परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राम मंदिर बैठक : कृष्ण मोहन यांच्याकडे प्रभारी पद; चंपत राय, मिश्रांचे राजीनामे मंजूर

लुटारू टोळीच्या उलट्या बोंबा

आजचे राशिभविष्य, ७ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पावसाळ्यातील खास अंदाज! सावनी रवींद्रचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन