नांदेड : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे दोन आठवड्यांच्या गुंतागुंतीच्या आजारपणानंतर सोमवारी पहाटे हैदराबाद येथे निधन झाले. या दुःखद घटनेनंतर नायगाव-मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह विविध पक्षांतील राजकीय नेत्यांनी वसंतरावांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांनी १५ ऑगस्ट रोजी नुकतेच ७१व्या वर्षात पदार्पण केले होते. पण त्याच्या दोन दिवस आधी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला, म्हणून नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांची हृदयक्रिया बंद पडली होती. पण तातडीच्या उपचारांनंतर ती पूर्ववत झाली, तरी मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे १३ ऑगस्ट रोजी त्यांना मेंदूवरील उपचारासाठी हैदराबादच्या किम्स रुग्णालयात पाठविण्यात आले.
हैदराबाद येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून झालेल्या उपचारांमुळे ते या गंभीर आजारपणातून बाहेर येतील, अशी अपेक्षा केली जात असतानाच रविवारी मध्यरात्री त्यांची हृदयक्रिया बंद पडल्यामुळे ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी सोमवारी पहाटे जाहीर केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी मुख्यमंत्री तसेच खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, माजी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्यासह अनेक नेत्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केली. वसंतरावांचे पार्थिव दुपारनंतर नायगाव येथे आणण्यात आले. या शहरावर सकाळपासूनच शोककळा पसरली होती. सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. नायगावसह संपूर्ण तालुक्यात दुखवटा पाळण्यात आला.
वसंतराव चव्हाण यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५४ साली नायगाव येथे झाला. वयाच्या २४व्या वर्षी ते नायगावचे सरपंच झाले. येथून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात नांदेड जिल्हा परिषद, २००२ ते २००८ विधान परिषदेचे आमदार आणि २००९ ते १९ दरम्यान त्यांनी विधानसभेचे आमदार म्हणून आपल्या भागाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांनीही विधान परिषद व विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच काँग्रेस पक्षाने नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी निश्चित केली. तत्पूर्वी, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले असताना काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते, आपले विस्तारीत कुटुंब तसेच जिल्हाभरातील हितचिंतकांच्या पाठबळावर निवडणुकीस सामोरे जात वसंतरावांनी ५ लाखांहून अधिक मते घेत भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांचा दारुण पराभव केला होता. त्यांच्या या विजयाची नोंद दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनीही घेतली होती.
शरद पवार, राहुल गांधी यांची श्रद्धांजली
वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांनी शोक व्यक्त करून वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. जनतेशी जोडले गेलेले नेतृत्व हरपले असल्याची भावना या सर्वांनीच व्यक्त केली.