नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेत ८१ पैकी ४५ जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
भाजपकडून ४ नावांची जोरदार चर्चा
भाजपकडून या प्रवर्गातून एकूण १२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी चार जणांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. यात ज्योती कल्याणकर, सुदर्शना खोमणे, वैशाली देशमुख आणि कविता मुळे यांचा समावेश आहे.
ज्योती कल्याणकर
ज्योती कल्याणकर प्रभाग क्रमांक १ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या; माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजपामध्ये प्रवेशानंतर त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी त्यांना भाजपाकडून प्रभाग क्रमांक १ मधून उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर आरक्षण जाहीर झाल्याने ज्योती कल्याणकर या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
सुदर्शना खोमणे
सुदर्शना खोमणे प्रभाग क्रमांक १० मधून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती महेश उर्फ बाळू खोमणे हे राजकारणात सक्रिय असून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आहेत. माजी विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचा महापालिका कारभाराचा अनुभव आहे. त्यामुळे बाळू खोमणे यांच्या राजकीय वजनामुळे महापौर पदाची संधी सुदर्शना खोमणे यांना मिळू शकते, असा अंदाज आहे.
वैशाली देशमुख
वैशाली देशमुख प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आल्या आहेत. महापालिका सभागृहात त्यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील त्यांनी भाजपाकडून निवडून येऊन महापालिकेत काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही महापौरपदाची संधी असू शकते.
कविता मुळे
कविता मुळे प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाकडून निवडून आल्या आहेत. त्यांनी नगरसेवक पदासाठी दुसऱ्यांदा संधी मिळवली आहे आणि महापालिका स्थायी समितीच्या सदस्य म्हणून काम केले आहे. माजी खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे त्यांनाही महापौरपदाची संधी मिळू शकते. सध्या महापौरपदासाठी भाजपकडून कोणाची लॉटरी लागणार, हे लवकरच स्पष्ट होईल.