केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपले मत मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुरुवातीलाच त्यांच्यात आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. झाले असे की, पत्रकारांनी त्यांना पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दरवाढीवरून प्रश्न विचारला. यावरून ते म्हणाले की, "तुम्ही पत्रकार नाहीत, तर समाजसेवक आहेत किंवा शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहेत." असे म्हणताच पत्रकार आणि नारायण राणेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताच, पत्रकारांनी यावर आक्षेप घेतला. 'प्रश्न विचाराने हे आमचे काम आहे' असे नारायण राणेंना म्हणाले. यानंतर राणे म्हणाले की, "आधी अर्थसंकल्प पूर्ण वाचा. अर्थसंकल्प खूप मोठा आहे आणि मी प्रत्येक गोष्टीवर सविस्तर बोलू शकत नाही. सविस्तर माहिती घेता येईल म्हणूनच मी पत्रकार परिषद संध्याकाळी घेतली. मला प्रत्येक तरतूद सांगता येणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीशी बोलताना तुम्ही त्याला ग्राह्य धरता, हे काय आहे? आता तुम्ही जे काही बोललात त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे?" असा सवाल त्यांनी विचारला.
यावरून पत्रकारांनी पुन्हा नारायण राणेंना प्रश्न करत विचारले की, "आधी गॅस सिलिंडरची किंमत ही ५०० ते ७०० होती, मात्र आता ११०० रुपये झाली आहे. गृहिणींवर याचा मोठा परिणाम होत असून या महागाईत या अर्थसंकल्पाकडून गोरगरिबांना दिलासा मिळेल असे वाटत होते" यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, "ज्यांना गॅस सिलिंडर भरायचा त्यांना भरू द्या, जे भारत असतील त्यांचे उत्पन्न जास्त असतील." असे उत्तर दिले.