नाशिक : एनए प्लॉट विकसित करून देण्याचे आणि विक्रीचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील ११ नामांकित बिल्डर्स व विकासकांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या म्हाडा घोटाळ्यानंतर बांधकाम क्षेत्रात हा आणखी एक मोठा धक्का मानला जात असून, या प्रकरणामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ॲड. हेमंत सुरेश सातभाई यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबूलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा तसेच शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे शरद कुटे आणि भास्कर आनंदराव पवार अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण मखमलाबाद शिवारातील जुन्या सर्व्हे क्रमांक ३८८ व ३८९ मधील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियोजित ले-आऊटशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र, त्यानंतर संबंधित प्लॉटचे कायदेशीर खरेदीखत करून देण्यास संशयितांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. यापुढे आर्थिक फायद्यासाठी बिल्डर्स आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून कट रचला आणि २४ डिसेंबर २०२० रोजी बनावट खरेदीखताच्या आधारे हाच प्लॉट तिसऱ्याच व्यक्तीच्या नावावर विकल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, अशाच प्रकारे इतर अनेक सभासदांचीही फसवणूक करण्यात आली असून, गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि एमपीआयडीसारख्या गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने काही प्रमुख संशयितांनी अटक टाळण्यासाठी घाईघाईने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सरकारवाडा पोलिसांकडून सुरू असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संगनमत करून कट रचल्याचा आरोप
फिर्यादी ॲड. सातभाई यांनी १९९८ मध्ये संबंधित सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. त्यावेळी शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने एनए प्लॉट विकसित करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ॲड. सातभाई यांनी प्लॉट क्रमांक १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) यासाठी संपूर्ण रक्कम भरली होती. तसेच त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले होते.