नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असलेला मोठा असंतोष शुक्रवारी उफाळून आला. मेरी-म्हसरूळ भागातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी प्रशासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध केला.
आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा या महत्त्वाच्या लिंकरोडवर खड्ड्यांमुळे झालेल्या विविध अपघातांमध्ये गेल्या दोन महिन्यांत तब्बल चार बळी गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या जीवघेण्या परिस्थितीमुळे
संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला आणि तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रिंगरोडचे स्वरूप असलेल्या या रस्त्याची रुंदी ९ मीटर देखील नाही. १८ फूट रुंदीच्या या रस्त्याच्या साईडपट्ट्या खोलवर असल्याने त्या वाहतुकीसाठी अजिबात वापरता येत नाहीत, ज्यामुळे रस्त्याच्या अरुंदपणात भर पडली आहे.
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या समस्येची प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून देण्यात आली, मात्र तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
हा लिंकरोड अतिशय मोठ्या वर्दळीचा आहे. या भागात अनेक महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे लोकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. याशिवाय, गुजरातला जाणारी तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरील काही वाहतूक याच रस्त्यावरून होते. नाशिकमधून जाणाऱ्या उड्डाणपुलावर चढण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर असल्याने दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावतात.
"नाशिकमध्ये वाहनसंख्या प्रचंड वाढली असताना पायाभूत सुविधा विकसित करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी शहरवासीय हैराण झाले आहेत. आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा लिंकरोड अरुंद असला तरी येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची सरासरी संख्या तीस हजारांच्या घरात आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनही कार्यवाही झाली नाही. आज सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि आम्ही रस्त्यावर आलो. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल."प्रसाद सानप, उपाध्यक्ष, मनसे नाशिक
आज झालेल्या आंदोलनात महिला, युवक, नागरिक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी राजू देसले, प्रसाद सानप, सुनील निरगुडे, रवि गायकवाड, विशाल कदम, रवि कापसे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.