विशाळगड हा इतिहासात घडलेल्या विविध घटनांमुळे आजही प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक या गडाला भेट देत असतात. अशातच आता हा गड एका नव्या वनस्पतीमुळे अधिक चर्चेत आलेला आहे. कंदीलपुष्प वनस्पतीच्या कुलातीत नव्या प्रजातीची वनस्पती विशाळगडावर आढळून आलेली असून कोल्हापुरातील अभ्यासकांनी या दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पतीचा शोध लावला आहे.
कोल्हापूरच्या न्यू कॉलेजचे अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉ निलेश पवार तसेच चांदवड येथील डॉ शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील डॉ एक आर यादव या अभ्यासकांनी मिळून विशाळगडावर सापडलेल्या दुर्मिळ प्रजातीचे संशोधन करून तिच्या शोधावर शिक्कामोर्तब केला. वनस्पती अभ्यासक असलेले अक्षय जंगम आणि डॉ निलेश पवार हे गेली सहा वर्ष जिल्ह्यातील किल्ल्यांवर आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. हा अभ्यास सुरु असताना ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील ही वनस्पती आढळली. ही प्रजाती कंदीलपुष्प वर्गातील प्रजातींपेक्षा थोडी वेगळी वाटल्याने त्यांनी यावर अभ्यास सुरु केला.
अक्षय जंगम आणि डॉ निलेश पवार यांनी भारतामधील कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतींचे तज्ञ डॉ. शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ही कंदीलपुष्प वर्गातील नवी प्रजाती असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या अभ्यासकांनी केलेल्या शोध मोहिमेवर लिहिलेला निबंध हा न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये नुकताच प्रकशित करण्यात आलेला आहे.
वनस्पतीला देण्यात आलं शिवरायांचं नाव :
विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. शिवरायांनी तयार करून घेतलेल्या आज्ञापत्रातून देखील त्यांचा निसर्ग आणि पर्यावरणबदलाचा विचार पुढे आलेला आहे. तेव्हा अभ्यासकांनी विशाळगडावर नव्याने शोध लागलेल्या कंदीलपुष्पातील नव्या प्रजातीला ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे नाव दिले.