महाराष्ट्र

उत्पन्न नव्हे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या! शरद पवारांचा भाजप व केंद्र सरकारवर हल्लाबोल

Swapnil S

मुंबई : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे सोडा, त्यांच्या आत्महत्याच या काळात दुपटीने वाढल्या असून, याला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरमधील बार्शी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केला आहे.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीत रविवारी 'शरद शेतकरी संवाद मेळावा' पार पडला. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोल दिले जात नाही, म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळायला हवा, हा एकच पर्याय असल्याचे पवार म्हणाले.

आम्ही जात, पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळला. कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे, असे सांगितले होते. ५० टक्क्यांमध्ये आणून आम्ही आरक्षण देणार आहे, आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

अन्यायकारी सरकार खाली खेचा

लोकसभेला ४०० पार म्हणणाऱ्यांना ३०० ही पार करता आले नाहीत. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे आमच्यात कोणी नाही. या सरकारला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. यांची धोरणे बदलायची असेल तर सरकार बदला. अन्याय आणि जुलूम करणारे सरकार खाली खेचा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत