महाराष्ट्र

"एकदा आरक्षण कधी मिळणार तेही मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे..."; राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

Rakesh Mali

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला आज मोठे यश मिळाले. जरांगे यांनी सरकारपुढे मांडलेल्या सर्व मागण्या मान्य करत सरकारने नवीन अध्यादेश जारी केला. यावर सकाळपासूनच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे अभिनंदन करीत एक सल्ला दिला आहे. "आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींनाही खरी परिस्थिती समजेल" असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत 'एक्स'हँडलवर पोस्ट करत जरांगे यांचे अभिनंदन केले आहे. "मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींनाही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!", असे राज यांनी म्हटले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले. यानंतर जरांगे यांचा मोर्चा मुंबईत्या दिशेने सरकत गेल्यानंतर सरकारने यावर तोडगा काढायला सुरुवात केली. जरांगे यांचा मोर्चा मुंबईत येऊ नये साठी मध्यरात्री घेण्यात आलेल्या बैठकीत जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. आज(27 जानेवारी) सकाळी नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या हातात शासनाचा सुधारित अध्यादेश दिला. तसेच, त्यांचे उपोषणही सोडवले.

मराठा समाजाच्या मान्य झालेल्या मागण्या

  • जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार

  • सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळणार

  • आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे

  • वंशावळी जोडण्याकरता शासननिर्णय

  • शिंदे समितीला मुदतवाढ

  • शिक्षणात ओबीसींप्रमाणे सवलत

  • पुढील अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर

“मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब मराठा समाजाचे दु:ख आणि वेदनेची कल्पना आहे. त्यामुळेच मी छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीरपणे शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम आज मी करतोय. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, आता राज ठाकरे यांनी ट्वीटकरुन जरांगे यांना सल्ला दिल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा