रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक ‘कासव मित्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यंदा मोठे यश मिळाले आहे. सन २०२५-२६ च्या हंगामात राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १ हजार ७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद झाली असून, त्यांमधून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ पिल्लांना यशस्वीरीत्या समुद्रात सोडण्यात आले. यंदाच्या हंगामात उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरट्यांची नोंद झाली असून, तेथून ५४ हजार २२७ पिल्ले समुद्रात झेपावली, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांतून ५३ हजार ३२५ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक ६९.९५ टक्के उबवण यशाची नोंद झाली असून, रायगड जिल्ह्यातील २२ घरट्यांतून १ हजार ४४ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.
विशेष म्हणजे, यंदा रायगडमधील आरावी, रत्नागिरीतील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे, पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्गमधील दाभोळी व कोंडुरा या किनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी आढळली. त्यामुळे ही किनारपट्टी ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सागरी परिसंस्थेचा समतोल राखणाऱ्या या संरक्षित कासवांच्या संरक्षणासाठी वन विभागाने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सन २०१८ पासून सुरू असलेल्या नुकसानभरपाई योजनेंतर्गत मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांना जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत ४८६ कासवांना वाचविण्यात यश आले असून, मच्छिमारांना सुमारे ६१ लाख २१ हजार ८५० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
‘मरीन रिस्पॉन्डंट’ गटांची स्थापना
पावसाळ्यात जखमी अवस्थेत किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या कासवांवर तातडीने उपचार करण्यासाठी कांदळवन कक्षाने ‘मरीन रिस्पॉन्डंट’ गटांची स्थापना केली आहे. या गटामध्ये वन कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या डहाणू येथे उपचार व संक्रमण केंद्र कार्यरत असून, मुंबई आणि परिसरातील किनाऱ्यांसाठी ऐरोली येथे सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे.
तात्पुरती उपचार केंद्रे
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.स्थानिक ग्रामस्थ, ‘कासव मित्र’ आणि प्रशासन यांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा संवर्धन उपक्रम समुद्री जैवविविधतेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा ठरत असून, राज्यातील किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाला नवी बळकटी मिळत आहे.