पंढरपूर : पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ या वर्षासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निर्णयाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
दिनांक ३० जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या या निधीमुळे पंढरपूर मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील विविध मंजूर कामांसाठी खर्च करता येणार असून, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळाल्यामुळे सुविधा विकासास मोठी चालना मिळणार आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, "राज्य शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे वारी काळात लाखो वारकऱ्यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील. या निधीचा प्रभावी वापर करून मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रशासनाला मोठी संधी मिळाली आहे."
त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबरच संबंधित प्रशासन, शासन यंत्रणा आणि सेवाभावी संस्था यांचेही मन:पूर्वक आभार मानले. तसेच सर्व वारकऱ्यांना आगामी वारीसाठी शुभेच्छा दिल्या.