शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार मनीषा कायंदे यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये 'अर्बन नक्षली' शिरल्याचा गंभीर आरोप केला. हा दावा केवळ ऐकीव नसून यामागे ठोस पुरावे असल्याचे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हे आरोप केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मनीषा कायंदे यांनी सांगितले, की ''राज्यभरात अत्यंत सांप्रदायिक वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये अन्य धर्मीय, नास्तिक आणि नक्षलवादाशी संबंधीत आरोप असलेले विविध लोक व 'लोकायत' सारख्या अनेक संस्थांचे लोक सहभागी होवून पथनाट्य अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संत साहित्य व संतांच्या विचारांची मोडतोड करून साध्याभोळ्या वारकऱ्यांचा बुद्धीभेद करीत असल्याचे वारकरी संस्थांचा आरोप आहे. अशा व्यक्ती व संस्थांवर शासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी पॉइंट ऑफ इनफार्मेशनच्या माध्यमातून आज विधानपरिषद सभागृहात केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीचे पवित्र्य व वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अश्या व्यक्ती व संस्थांची गृहविभागामार्फत तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. ''
मनीषा कायंदे सभागृहात काय म्हणाल्या?
मनीषा कायंदे सभागृहात म्हणाल्या की ''आपल्याला माहीत आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे. गोर गरिबांचे देवस्थान असलेले विठूरायांवर श्रद्धा असलेले लाखों वारकरी यात सहभागी होत असतात. वैष्णवांच्या या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे.''
लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न -
पुढे त्या म्हणाल्या, की ''वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षली जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा 'लोकायत' या नावाखाली वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणे देतात. त्या द्वारे लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला माहीत आहे, की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक देखील अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी आहे.''
''मागे देखील काही दिवसांपूर्वी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचे काम केलं. तसेच बंड्यातात्या कराडकर यांनी देखील या विषयावर खूप भाष्य केलेले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेले आहे. दोन दिवसांत आषाढी एकादशी पण येतेय. शासनाने यावर त्वरित अॅक्शन घ्यावी आणि हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे. लोकांचा बुद्धिभेद करणं किंवा त्यांना देवांपासून दूर नेणे हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे प्रकार सुरू आहेत. तर शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी,'' अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली.