पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय 
महाराष्ट्र

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

२००६ मध्ये घडलेले पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेल्या राजकीय खून प्रकरणांपैकी एक मानले जाते. या प्रकरणात...

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. विशेष CBI न्यायालयाने सुनावणी २० जूनपर्यंत तहकूब केल्याने जवळपास दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

निकालासाठी आणखी चार दिवसांची प्रतीक्षा

या प्रकरणाचा निकाल मंगळवारी जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, विशेष CBI न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल लेखन पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता असल्याचे सांगत सुनावणी २० जूनपर्यंत तहकूब केली.

२००६ मध्ये घडलेले पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेल्या राजकीय खून प्रकरणांपैकी एक मानले जाते. या प्रकरणात राजकीय वैर, सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे चर्चेत आली होती.

ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची भावनिक पोस्ट

पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज सकाळी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती.

"माझे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे २० वर्षे झाली. आजही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळिमा फासला, त्यांच्याबाबत आज फैसला होईल, अशी अपेक्षा आहे," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

न्यायालयाचा निकाल मंगळवारी जाहीर होईल, या अपेक्षेने त्यांनी ही पोस्ट केली होती. मात्र, निकाल पुढे ढकलण्यात आल्याने निंबाळकर कुटुंबीयांसह राज्यातील अनेकांचे लक्ष आता २० जूनकडे लागले आहे.

पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांचे नाते

पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ होते. पद्मसिंह पाटील यांनी राज्यात गृहमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली होती. हत्याकांडाच्या तपासादरम्यान CBI ने जून २००९ मध्ये त्यांना अटक केली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

नेमके काय घडले होते?

३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी हे मुंबईहून धाराशिवकडे जात होते. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनाला अडवून दोन मारेकऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

CBI चा आरोप काय?

CBI च्या आरोपपत्रानुसार, राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. या कटामागे पद्मसिंह पाटील असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात लातूरचे व्यावसायिक सतीश मंदादे, निवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला तसेच गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्यांसह अनेक आरोपींवर खटला दाखल करण्यात आला.

३० लाख रुपयांची सुपारी

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे. ही सुपारी सुरुवातीला परसमल जैन यांनी स्वीकारली होती. नंतर त्यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आणि त्यांनी न्यायालयात इतर आरोपींविरोधात महत्त्वाची साक्ष दिली.

तपास CBI कडे कसा गेला?

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांकडे होता. मात्र, तपासाबाबत असमाधान व्यक्त करत पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले. CBI ने तपास हाती घेतल्यानंतर जून २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

१५ वर्षे चाललेला खटला

'दि न्यू इंडियन एक्सप्रेस' च्या वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी जुलै २०११ मध्ये सुरू झाली. गेल्या दीड दशकात विशेष न्यायालयाने एकूण १२८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

या साक्षीदारांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही समावेश होता. माफीचा साक्षीदार परसमल जैन यांच्या कबुलीजबाबात अण्णा हजारे यांच्या हत्येसाठीही स्वतंत्र सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर अण्णा हजारे यांनी न्यायालयात साक्ष देताना पद्मसिंह पाटील यांच्याकडून धमक्या मिळाल्याचा दावा केला होता.

निकालाकडे राज्याचे लक्ष

जवळपास दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण