शरद पवार 
महाराष्ट्र

पवारांनी व्यक्त केली मणिपूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती; भाजपची टीका

महाराष्ट्रातही मणिपूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातही मणिपूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यावर भाजपने हल्ला चढविला आहे. पवार यांचे विधान अयोग्य असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. पवारांच्या वक्तव्यामुळे दंगलींना चिथावणी मिळू शकते, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मणिपूरमधील वांशिक संघर्ष सरकारने ज्या पद्धतीने हाताळला त्यावर पवार यांनी रविवारी नवी मुंबई येथे आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत टीका केली. राज्यात मणिपूरसदृश स्थिती का निर्माण होऊ शकते, त्याचे कारण पवार यांनी स्पष्ट केले नाही. तथापि, मराठा-ओबीसी आरक्षण संघर्षामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी वरील भीती व्यक्त केली. देशाच्या विविध भागांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक ऐक्य अबाधित राहावे यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

पवारांनी प्रथम भूमिका स्पष्ट करावी - पंकजा मुंडे

शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका प्रथम स्पष्ट करावी, असे भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पवार यांची या प्रश्नावरील भूमिका काय आहे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असेही त्या म्हणाल्या.

अशा वक्तव्याने दंगलींना चिथावणी मिळेल - बावनकुळे

पवारांच्या विधानामुळे दंगलींना चिथावणी मिळू शकते, मात्र राज्यातील जनता सुज्ञ आहे, ती दंगली घडू देणार नाही. काहीजण समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

मराठ्यांना ओबीसींचा कोटा देण्यास कराड यांचा विरोध

मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये, असे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास एक ओबीसी म्हणून आपला विरोध आहे, असेही कराड म्हणाले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली