महाराष्ट्र

कोल्हापुरी चप्पल विकली जाणार ८४ हजार रुपयांना; २ हजार जोड बनवून घेण्याचा ‘प्राडा’चा निर्णय

इटलीतील लक्झरी ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चपलांचे ८४ हजार रुपयांचे लिमिटेड एडिशन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कारागिरांच्या सहभागातून तयार होणाऱ्या या उपक्रमामुळे कोल्हापुरी परंपरेला जागतिक ओळख मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : कोल्हापुरातील ‘कोल्हापुरी चपलां’वरून गेल्यावर्षी वाद निर्माण झाला होता. आता इटलीतील लक्झरी ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चपलेचे ‘लिमिटेड एडिशन’ काढण्याचे ठरवले आहे. या एका चपलेच्या जोडाची किंमत ८४ हजार रुपये (९३० युरो) असणार आहे, अशी माहिती ‘प्राडा’चे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह लोरेन्झो बर्टेली यांनी दिली.

कोल्हापुरी चपलेचे उत्पादन स्थानिक कारागीरांकडून करून घेण्यात येईल. या चप्पलेचे २ हजार जोड बनवण्याचे ठरवले आहे. कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

पारंपरिक चप्पल निर्मितीची पद्धत, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला ‘प्राडा’ची आधुनिक साथ मिळणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले आहे. हा करार प्रधान सचिव तथा ‘लिडकॉम’चे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘लिडकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या कराराने भारतातील अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांचा फायदा होणार आहे.

‘लिडकॉम’च्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

‘प्राडा’ समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी ओळख आहे. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगात योग्य स्थान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

कोल्हापुरी चपलांना जीआय टॅग

पारंपरिक कोल्हापुरी चप्पला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांत बनवल्या जातात. २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलांना ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ (जीआय) टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग