महाराष्ट्र

मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेचे तीव्र पडसाद; पैशासाठी उपचार न केल्याने गर्भवतीचा मृत्यू, चौकशीचे आदेश

पैशासाठी उपचार करण्यात अडवणूक केल्याने भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांना प्राण गमवावे लागल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Swapnil S

पुणे (प्रतिनिधी) : पैशासाठी उपचार करण्यात अडवणूक केल्याने भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांना प्राण गमवावे लागल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या या असंवेदनशीलतेबद्दल पुण्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, विविध पक्ष, संघटना शुक्रवारी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील नावाजलेले रुग्णालय म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे नाव घेतले जाते. मंगेशकर कुटुंबीयांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या रुग्णालयात रुग्णांची नेहमी गर्दी असते. मात्र, तनिषा भिसे यांच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या मुद्द्यावरून रुग्णालय वादात सापडले आहे. रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेपोटी उपचार करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेताना तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला.

तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी काय सांगितले?

सुशांत भिसे यांच्या भगिनी प्रियांका पाटील म्हणाल्या, त्यादिवशी आम्ही सकाळी ९ वाजता मंगेशकर रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितले. तिथे असेसमेंट रूममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल. त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल. सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, असे सांगितले. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल. मात्र, आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरा, अशी सूचना केली. पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही म्हटले. हे सर्व आमची वहिनी तनिशा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे तिच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती, त्यात खर्चाचा आकडा पाहून ती कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली. आम्ही पैशांची व्यवस्था करतो, अशी विनंती वारंवार करत होतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, असेही म्हणालो. पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने वहिनीचा मृत्यू झाला. दरम्यान, जन्मलेल्या एका बाळाचे व्हेटिंलेटर काढले असून, दोन्ही बाळांची प्रकृती आता स्थिर आहे, असेही सांगण्यात आले.

माहिती दिशाभूल करणारी - रुग्णालय प्रशासन

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात जी माहिती समोर आली आहे, ती दिशाभूल करणारी आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही सर्व माहिती देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

घैसास यांच्या वडिलांच्या नर्सिंग होमची तोडफोड

भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन केल्यानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत निषेध नोंदविला. यावेळी डॉ. नीलिमा घैसास म्हणाल्या, सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा ४० वर्षांपासून रुग्णालय चालवत आहोत. तसेच त्याने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी