महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अखेर शुक्रवारी (दि.१०) तब्बल ११ वर्षांनी निकाल आला. पुण्यातील विशेष UAPA न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ,पाच लाखांचा दंडही ठोठावला. तर, तीन आरोपींची मात्र सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. निकालाबाबत एका पातळीवर समाधान असले तरी काही महत्त्वाची प्रश्न अनुत्तरीत असल्याची प्रतिक्रिया दाभोलकरांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या गुन्ह्यात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे पाच आरोपी होते. यांच्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानत विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेप सुनावली आहे. मात्र, कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याच्यासह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, तावडे हा या हत्येचा मुख्य सूत्रधार होता.
शिवाजीनगर न्यायालयाच्या संकुलाबाहेर पत्रकारांशी बोलताना दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद म्हणाले, “दोन्ही हल्लेखोरांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे एका पातळीवर आम्हाला समाधान आहे. पण या हत्येमागील सूत्रधार आणि व्यापक कट याविषयीचे प्रश्न अनुत्तरीत आहेत.”
डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर एसआयटी आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या हत्या प्रकरणांचा तपास केला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले.