पुणे : पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरधाव बिल्टवेस् इंटरप्रायझेस कंपनीच्या डम्परने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तसेच सात जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डम्परचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते.
विशाल विनोद पवार (२२, अमरावती), वैभवी रितेश पवार (१ वर्ष), वैभव रितेश पवार (२ वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तसेच जानकी दिनेश पवार (२१), रिनिशा विनोद पवार (१८), रोशन शशादू भोसले (९), नगेश निवृत्ती पवार (२७), दर्शन संजय वैराळ (१८), आलिशा विनोद पवार (४७) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व लोक अमरावतीहून पुण्यात मजुरीसाठी आले होते आणि पुण्यात यायला उशीर झाल्याने सर्वजण फुटपाथवर झोपले होते. आरोपी डम्परचालक गजानन शंकर तोट्रे (२६, नांदेड) याला अटक करण्यात आली असून आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातावेळी डम्परचालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वाघोली पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. फुटपाथवर एकूण १२ जण झोपले होते, तर बाकी फुटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. भरधाव डम्पर सरळ फुटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावरून गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.