पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाजवळ २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेतील सर्व ६ आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती एस डी पंजवानी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये, पुणे पोलिसाकडून आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांना २ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागात गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला होता. न्यायालयासमोरच ६ जणांच्या टोळक्याने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. गोळीचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदार किवळेचा पाठलाग केला आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात मंदारचे दोन्ही हात तुटले होते. सध्या गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणात अमोल रामचंद्र चव्हाण (४८), स्वप्नील बाजीराव गवळी ( २८), ओंकार संतोष पवार ( १९) आणि सूरज साधू मळेकर ( २२) यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी हल्ल्याचे नियोजन कसे केले, त्यांना शस्त्रे कोणी उपलब्ध करून दिली आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.