उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थ सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. विशेषत: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याचे सतत हल्ले झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या परिस्थितीत, ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अनोख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही शेतकरी, महिला यांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळ्यांचा पट्टा घालून शेतात काम करण्यास सुरुवात केली आहे.
गेले अनेक दिवस पुण्यात बिबट्याचे हल्ले वाढत आहे. रात्रीच्या वेळी सामसुम रस्त्यावर फिरणारे बिबट्या आता दिवसाढवळ्या फिरू लागले आहेत. दिवसा शेतात काम करताना कुठूनही बिबट्या हल्ला करू शकतो. अखेर शेत हेच गावकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने, त्यांना शेतात काम करण्याशिवाय पर्याय नाही. तर, बिबट्या हा प्रामुख्याने मान आणि घोटावर हल्ला करतो. या परिस्थितीत, कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालण्याच्या तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांनी विशेषत: महिलांनी स्वतःला संरक्षित करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रशासनाचे अपयश आणि ग्रामस्थांची नाराजी
राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना पुरेसे संरक्षण देण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक आणि पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, जे अत्यंत लाजिरवाणे आहे.
नरभक्षक बिबट्याचा शेवट
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात नरभक्षक बिबट्याला वनविभागाने ठार केले आहे. रात्री उशिरा बिबट्याचा शोध घेत असताना तो ड्रोनमध्ये दिसला. प्रथम त्याला डार्ट मारून पकडण्याचा प्रयत्न असफल ठरला. नंतर दोन शार्प शूटरने बिबट्यावर तीन राऊंड फायर केले आणि ६ वर्षांचा हा नरभक्षक बिबट्या ठार झाला.
अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, याच बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय रोहन बोंबे या लहान मुलाचा मृत्यू झाला होता. ठार करण्यात आलेल्या याच बिबट्याने हा हल्ला केल्याचे वनविभागाच्या नमुन्यांवरून स्पष्ट झाले आहे.
बिबट्याचे हल्ले आणि ग्रामस्थांची सुरक्षा
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये मागील दोन वर्षांत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस आणि पाळीव कुत्रे यांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. आता बिबट्यांचे हल्ले लहान मुलांनाही लक्ष्य करत आहेत.
ग्रामस्थांनी वनविभागावर पिंजरे लावण्याची मागणी केली, पण बिबट्यांच्या पिंजऱ्यांत भक्षक न येणे किंवा अभाव असणे हे वारंवार घडत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. सध्या शेतकरी वर्ग बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराज आहे.
ग्रामस्थांची अपेक्षा आहे की वनविभाग त्वरित बिबट्यासाठी प्रभावी पिंजरे लावावे. सध्या तालुक्यांच्या गावांमध्ये नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली राहत असून टोकदार खिळ्यांचे पट्टे घालून वावरणे हाच एकमेव उपाय असल्याचे ग्रामस्थांनी म्हंटले आहे.