महाराष्ट्र

बिबट्यांचा वाढता कहर रोखण्यासाठी ७०० पिंजरे, २५० कॅमेरे आणि १.२५ कोटींचा निधी मंजूर; पकडलेले बिबटे पुन्हा न सोडण्याचा निर्णय

आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्तीवरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा न सोडता त्यांना कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Swapnil S

पुणे : आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्तीवरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा न सोडता त्यांना कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

त्यांनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत, “या भागातील बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे,” असे स्पष्ट केले. सध्या आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांमध्ये सुमारे २,००० बिबटे आहेत, तर २०१७ मध्ये ही संख्या फक्त २५० च्या आसपास होती.

त्यामुळे किमान १,५०० बिबटे तरी या भागातून स्थलांतरित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी वन विभागाला आवश्यक साधनसामग्री पुरवण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. वन विभागाने ५०० नवीन पिंजऱ्यांची मागणी केली होती; परंतु प्रशासनाने एकूण ७०० पिंजऱ्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक गावात किमान एक ते दोन पिंजरे उपलब्ध होतील.

१० दिवसांत २०० पिंजरे आणि २० दिवसांत सर्व ७०० पिंजरे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, बिबट्यांना ट्रॅक करण्यासाठी २५० कॅमेरे आणि अतिरिक्त गाड्या खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

वन विभागाला निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला निर्देश दिले की, “खरेदी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी टेंडर न काढता थेट खरेदी करावी आणि पकडलेले बिबटे पुन्हा सोडू नयेत. बिबट्यांना पकडून स्थलांतरित करण्याचे काम दर आठवड्याला १०, ५०, १०० या टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऊसामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ

या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सांगितले की, बिबट्यांची संख्या वाढण्यामागे आडसाली ऊसपिकाचे मोठे योगदान आहे. मे-जूनमध्ये लावलेले ऊसपिक १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ शेतात राहते. या काळात ऊसाच्या झुडपांमध्ये बिबटे सुरक्षितपणे वास्तव्य करतात आणि पिल्लांना जन्म देतात.

दोन वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यांत १० जणांचा मृत्यू

गेल्या दोन वर्षांत जांबुदगाव आणि पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. ऊसतोड कामगार, शेतात पाणी देण्यासाठी किंवा गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे हा पट्टा ‘बिबट्यांचा हब’ बनल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जोपर्यंत बिबट्यांची संख्या नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुले आणि वयस्करांना एकटे बाहेर पाठवू नये, तसेच रात्री शेतात जाणे टाळावे. वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्यात संवादाचा अभाव दूर करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. बिबटे पकडण्यात तज्ज्ञ असलेले पथक चंद्रपूर येथून बोलावण्यात येणार असून, प्रत्येक गावात स्थानिक समित्या गठित करणे. शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागू नये म्हणून, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांतील फीडर्सना सकाळच्या सत्रात सलग वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी पुणे

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

सरकारी बँकांनी धोरण बदलावे; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टोचले कान

भारत-पाकिस्तान संघर्षात ८ विमाने पाडण्यात आली; आता ट्रम्प यांनी केला नवा दावा, युद्ध थांबविल्याचाही केला पुनरुच्चार

ॲक्वा लाईन मेट्रोमुळे बेस्टचे प्रवासी घटले! प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी अधिक गाड्या सोडण्याच्या विचारात प्रशासन

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट; आज सविस्तर भूमिका मांडणार