मुंबई : परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिन आकारले जाणारे ५० रुपये शुल्क माफ करण्याची घोषणा मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.
रिक्षा, टॅक्सीच्या परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिन ५० रुपये शुल्क आकारले जाते. परवाना नूतनीकरणास एक दिवस विलंब झाला तर आकारले जाणारे ५० रुपये शुल्क माफ करावे, अशी मागणी रिक्षा, टॅक्सी संघटनांनी लावून धरली होती. तसेच रिक्षा, टॅक्सीचालकांनीही राज्य सरकारकडे शुल्क माफ करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मोटार वाहन अधिनियमानुसार कायदेशीर तपासणी करून शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दादा भुसे यांनी विधानसभेत जाहीर केले.
परवाना नूतनीकरण विलंब शुल्क माफ केल्याने राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सीचालकांना दिलासा मिळणार आहे, असेही भुसे यांनी नमूद केले.