मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाशी संवाद साधत तातडीची पावले उचलली आहेत. त्यामुळे आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी १३ लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदीचा निर्णय झाला असून खरेदी केंद्रांवर सोयाबीनला ४,८९२ रुपये हमी भाव मिळणार आहे. त्याचबरोबर सोयाबीनमधील ओलाव्याची अट १२ वरून १५ टक्के इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने केंद्रीय कृषीमंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी संपर्क करून महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केली होती.
शिंदे यांनी दखल घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आभार मानले आहेत.
नाफेड सोयाबीन खेरदी करताना १२ टक्के ओलावा असेल तरच खरेदी करते असा नियम आहे. यावर्षी राज्यात काढणीवेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सोयाबीन मध्ये १५ टक्के ओलावा आला.
हा सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडने असमर्थता दर्शवल्याने केंद्र शासनाने नाफेडला १५ टक्के ओलावा असलेला सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश दिले.
देशात असा निर्णय प्रथम घेतल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी सांगितले.
सोयाबीन पेंड परदेशात निर्यात करणार
सोयाबीन ओलाव्यातील तीन टक्के तफावतीचा खर्च राज्य शासनाने देण्याचा निर्णय झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आता प्रति क्विंटल ४८९२ रुपये हमी भाव मिळणार आहे. त्याचबरोबर खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी देशातली सोया पेंड परदेशात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्याला खुल्या बाजारात सोयाबीनला ५ हजार रुपये भाव मिळण्यास मदत होणार आहे.