सांगली : घटनात्मक सुधारणा करून शिक्षण व सरकारी नोकरीतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारला शुक्रवारी केली आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, सध्या शैक्षणिक व नोकरीच्या आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादा आहे. मात्र, तामिळनाडू सरकारने आरक्षणाची मर्यादा ७८ टक्क्यांपर्यंत नेली आहे. तर महाराष्ट्राने ७५ टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा का नेऊ नये, असा प्रश्न त्यांनी केला. याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. घटनात्मक सुधारणा करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी, असे पवार यांनी सुचवले. आरक्षण मिळण्याची भावना लोकांच्या मनात आहे. ती चुकीची नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळते त्याचेही रक्षण करणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.
मोदींच्या अधिकाधिक सभा व्हाव्यात
लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १८ ठिकाणी सभा झाल्या, त्यातील १४ जागांवर भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे आमची पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की, त्यांनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील, असा चिमटा पवार यांनी काढला.
ते म्हणाले की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व माझ्यावर लक्ष ठेवण्याची सूचना भाजप नेत्यांना केली आहे. पक्ष फोडण्याचे आवाहन ते जाहीर सभेतून करताहेत. देशाचे गृहमंत्रीच कायदा व सुव्यवस्थेविरोधात बोलत असतील तर या सरकारची भूमिका काय आहे, हे सांगायची गरज नाही. जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी समविचारी पक्ष, चळवळी व संघटनांनी एकसंधपणे याविरोधात लढायला हवे.
उशीर झाला पण चांगला निर्णय
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पवार म्हणाले की, उशीरा का होईना एक चांगला निर्णय झाला. आजवर ज्यांनी मराठीत दर्जेदार लेखन केले व नव्या पिढीतील साहित्यिकांना काही लिहायचे असेल तर त्यांना या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल. जागतिक स्तरावर आपले साहित्य नेण्याचा मार्गही गवसला आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे याबाबत अभिनंदन करतो.
तिसऱ्या आघाडीमुळे आम्हाला धास्ती
राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले, मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करताहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत.
आंबेडकरांना एकही जागा जिंकता येत नाही
मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याने शरद पवार आता मराठ्यांचे नेते आहेत, हे सिद्ध झाले, अशी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले की, ज्यांना राज्यात एकही जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी अशी टीका करीत असतात.
मविआतील जागावाटपाची चर्चा पुढील आठवड्यापर्यंत सुरू राहिल. पण ही चर्चा लवकरात लवकर संपवावी, असा माझा मविआतील नेत्यांना सल्ला आहे. त्यामुळे आपल्याला प्रचाराला सुरुवात करता येऊ शकेल. जनतेला बदल हवा असून मविआने त्याचा सन्मान राखायला हवा, असे ते म्हणाले.