महाराष्ट्र

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

राज्याचा २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

Swapnil S

मुंबई : राज्याचा २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी पुरस्कार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार राम सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राम सुतार हे जगविख्यात शिल्पकार आहेत. शंभर वर्षे वयाचे सुतार आजही शिल्पकलेत सक्रिय आहेत. त्यांनी राष्ट्रपुरुषांचे तसेच अनेक महान विभूतींचे पुतळे साकारले आहेत. जगभरातील अनेक शिल्पाकृतींच्या उभारणीत सुतार यांचे योगदान राहिले आहे. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड करताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांचे शिल्पही साकारताहेत!

मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हेच साकारत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.

जनतेच्या निखळ प्रेमाचे हे प्रतीक - अजित पवार

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्यातील १३ कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतीक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पकलेत महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले - एकनाथ शिंदे

भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कलातपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचे अभिनंदन केले. जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळा निर्माण करून देशाच्या अस्मिता चिन्हाचा यथोचित गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत. आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणाऱ्या कलामहर्षी सुतार यांचे या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कलासाधनेला शतशः प्रणाम. कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेने महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video