नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माझा सुध्दा पाठींबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी माझी सूचना असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आरपीआयच्या एका कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी रामदास आठवले मंगळवारी (दि. १६) नांदेडला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना आठवले म्हणाले, ओबीसी आरक्षणात सर्वच ओबीसींना आरक्षण मिळत नाही. कारण त्यासोबत त्यांना क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर तामिळनाडू राज्याप्रमाणे ओबीसी या आरक्षण संवर्गात असणारे दोन वेगवेगळे गट तयार करावेत. त्यातही ज्या मराठ्याचे उत्पन्न वार्षिक ८ लाखांपर्यंत आहे त्यांनाच ते आरक्षण मिळेल. याशिवाय राहुल गांधींनी काढलेली भारत जोडा यात्रा ही भारत जोडो नसून भारत तोडो यात्रा आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला आले आहे. मी आणि माझी माणसे राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांकडून राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगात राजकारण आणून उगीचच त्याला वेगळे वळण दिले जात आहे.