महाराष्ट्र

सह्याद्री साखर कारखाना निवडणूक : निवासराव थोरातांची उमेदवारी रद्द; प्रादेशिक सहसंचालकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

येथील बहुचर्चित सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथील प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) निर्णयाला स्थगिती दिली.

Swapnil S

कराड : येथील बहुचर्चित सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथील प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) निर्णयाला स्थगिती दिली. याचा फटका निवासराव थोरात यांना बसला असून त्यांच्या उमेदवारी अवैधतेचा निकाल कायम राहिला आहे. त्यामुळे निवासराव थोरात हे सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. थोरात हेच विरोधी पॅनेलचे प्रमुख असल्याने हा निर्णय स्व.यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या धक्कादायक घटनेमुळे सदर निवडणूक एकतर्फी होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना राज्याचे माजी मंत्री व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेले बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात आहे. गतवेळाच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांच्या विरोधकांनी तेव्हापासूनच करखानाही आम्ही ताब्यात घेणार, अशी भीमगर्जना करत दंड थोपटले होते. यामध्ये निवासराव थोरात यांनी स्वतःच विरोधी गटाची मोट बांधत स्व.यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या नावाने विरोधी उमेदवार रिंगणात उतरवले होते, यामध्ये स्वतः निवासराव थोरात यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज छानणीत थोरात यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हा सहकारी संस्थांच्या उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या समोर झालेल्या सुनावणीत अवैध ठरला होता. या विरोधात थोरात यांनी पुण्याच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. गायकवाड यांनी निवासराव थोरात यांच्यासह नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले होते.

मात्र प्रादेशिक सहसंचालकांच्या वरील निकालाला आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुरलीधर गायकवाड यांनी निवासराव थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. बुधवारी उच्च न्यायालयाने प्रादेशिक सहसंचालक यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांचा निवासराव थोरात यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवणारा निर्णय कायम राहीला आहे.

दरम्यान, विरोधी गटाचे पॅनल प्रमुखच तथा सरसेनापतीच राणांगणातून बाहेर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. येत्या ५ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव