महाराष्ट्र

संजय राऊत थांबता थांबेनात; मुख्यमंत्र्यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो केला पोस्ट

"पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला.राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग..."

Rakesh Mali

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बड्या नेत्यांचे कुख्यात गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत. यावरुन विरोधकांकडून राज्यकर्त्यांवर गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर हे फोटो शेअर करण्याचा धडाकाच लावला आहे. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचा आणखी एका पुण्यातील कुख्यात गुंड जितेंद्र जंगमसोबतचा फोटो शेअर केला आहे. जंगम याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळचा हा फोटो असून राऊतांनी या फोटोवरुन शिंदेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला.राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे .. याच्यावर खुन ,खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोका मधुन नुकताच बाहेर आला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते?त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते..या राज्याचे कठीण आहे)", असे राऊत यांनी म्हटले आहे.

कोण आहे जितेंद्र जंगम ?

राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत दिसत असलेली व्यक्ती पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम आहे. गेल्यावर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूकीवेळी जंगम याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह त्याच्या टोळीवर २०२१ मध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेल्यावर्षी कसबा निवडणुकीआधी जानेवारी महिन्यात त्याची जामीनावर सुटका झाली. यावेळी त्याने शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हाच फोटो शेअर करत राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, यापूर्वीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा गुंड हेमंत दाभेकर याच्यासोबतचा तर मुख्यमंत्री शिंदे यांचा गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो शेअर करत निशाणा साधला होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी