बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप आरोपी मोकाट आहेत आणि तपास नीट होत नसल्याने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. अखेर या आंदोलनाला यश आले असून संतोष देशमुखांच्या हत्येचा खटला लढण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवत आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली.
बीड जिह्यातील मस्साजोग गावात पवनऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्या एका कंपनीकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नातून गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर बीडसह राज्यभरात आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सात आरोपींना ताब्यात घेतले. तसेच घटनेच्या तब्बल २० दिवसांनी संशयित आरोपी वाल्मिक कराडने पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आठ आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हत्येतील कृष्णा आंधळे हा संशयित आरोपी अद्यापही फरार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत होती. याच प्रमुख एका मागणीसाठी मंगळवारपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲॅड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.