संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित!

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर कोर्टाने वाल्मिक कराडसह आरोपींना दणका दिला. वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींविरुद्ध बीडमधील विशेष मकोका न्यायालयाने मंगळवारी आरोप निश्चित केले. यावर आता पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे.

Swapnil S

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर कोर्टाने वाल्मिक कराडसह आरोपींना दणका दिला. वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींविरुद्ध बीडमधील विशेष मकोका न्यायालयाने मंगळवारी आरोप निश्चित केले. यावर आता पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे.

बीडमधील विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींना न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते, तर आरोपींचे वकील कोर्टात हजर होते. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी १८०० पानांच्या दोषारोपपत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला.

आरोप निश्चितीवेळी न्यायालयाने म्हटले की, “खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, जो खंडणीला आड येईल त्याला संपवणे, असे वातावरण तुम्ही सर्व आरोपींनी तयार केले. या संदर्भात तुमच्या विरोधात विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल आहेत. तसेच एकत्रितपणे समान उद्देशाने आपण गुन्हे केलेले आहेत आणि पुरावे नष्ट केलेले आहेत. याबद्दलही आपल्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. मकोकाअंतर्गत देखील आपल्यावर गुन्हा दाखल आहे.. सर्व आरोपींना तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का?” असा प्रश्न न्यायालयाने विचारला.

आरोप मान्य आहेत का, असे विचारताच वाल्मिक कराडने इतर आरोपींप्रमाणे चार वेळा आरोप मान्य नसल्याचे सांगितलं. यावेळी मी काही सांगू इच्छितो, असे वाल्मिकने म्हटले. तेव्हा न्यायाधीश पाटवदकर यांनी आरोपीला फटकारत तुम्हाला जेवढे विचारले तेवढे उत्तर द्या. जास्त बोलू नका असे सुनावले. यावेळी आरोपी वाल्मिक कराडने पुढे बोलताना म्हटले की, मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवले आहे.

पुराव्यांची कॉपी देण्याची आरोपींची मागणी

आरोपींच्या वकिलांनी फॉरेन्सिककडे दिलेल्या पुराव्यांची कॉपी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पुरावे स्वीकारता येणार नाही. आरोप निश्चित करण्याआधी आम्हाला कॉपी द्याव्यात, अशी मागणी केली. यावर तपास अधिकाऱ्यांनी खासगी पुरावे असून त्याचा गैरवापर होऊ शकतो. इतका मोठा डेटा आम्ही देऊ शकत नाही, असे सांगितले. दरम्यान, कोर्टाने सरकारी वकिलांना त्यांच्याकडे पुरावे मिळताच आरोपींच्या वकिलांना द्यावे, असे सांगितले.

आरोपींच्या प्रयत्नांना खीळ बसली - निकम

“न्यायालयाने अखेर आज वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगविरोधात आरोप निश्चित केले आहेत. वाल्मिक कराड अवादा कंपनीकडून खंडणी मागत होता. ही खंडणी मिळण्यास संतोष देशमुख यांनी अडथळा निर्माण केला, म्हणून त्यांचा कट रचून खून करण्यात आला. आमच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले. मात्र आरोप निश्चित झाल्यामुळे आता या प्रयत्नांना खीळ बसली आहे. यापुढे होणाऱ्या सुनावणीला सरकारतर्फे सादर केलेली कागदपत्रे आरोपीला मान्य आहेत की नाही, हे विचारले जाईल आणि पुढील काम सुरू होईल,” अशीही माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मोठी बातमी! महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती; राज-उद्धव दोघांकडूनही अधिकृत घोषणा; कोणत्या जिल्ह्यांत एकत्र लढणार?

'ही' शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत...; संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा एल्गार

सदानंद दाते यांचा पोलीस महासंचालकपदाचा मार्ग मोकळा; प्रतिनियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी

ठाण्याच्या राजकारणात हालचालींना वेग; महायुतीत अनिश्चितता, भाजपचा ५२ जागांसाठी आग्रह; मविआची औपचारिक घोषणा बाकी