महाराष्ट्र

महिला मतदारांसाठी जाहीर केलेल्या योजना दोन-तीन महिन्यांत बंद होतील! उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्ला

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर हल्ला चढविला.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर हल्ला चढविला. विधानसभेच्या आगामी निवडणुका जवळ येत असल्याने महिला मतदारांना आमिष दाखविण्यात येत असून ही योजना दोन-तीन महिन्यांतच बंद होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांची विजेची देयके माफ करण्यासाठी ज्याप्रमाणे घोषणा करण्यात आली, त्याप्रमाणे कर्जही माफ करावे, या मागणीचा उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुनरुच्चार केला. इतर मागासवर्गीयांच्या हिताला बाधा न पोहोचविता केंद्र सरकारने मराठा आणि इतर समाजांसाठीचे आरक्षण ५० टक्क्यांवर नेणारा कायदा संसदेत मंजूर करावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकारने अनेक योजना जाहीर केल्या, निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आमिष दाखविण्याची ही खेळी आहे, या योजना दोन-तीन महिन्यांत बंद होतील. सत्तारूढ आघाडीचे सरकार पुन्हा येणार नाही आणि हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तरी त्यानंतर योजना गुंडाळल्या जातील, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची घोषणा करण्यात आली. या योजना जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या अंमलबजावणीचा दुष्काळच असेल, या योजना जाहीर करून सरकार आपली दुष्कृत्ये दडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांचा पराभव झाला. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव का झाला त्याची कारणे मतदारांकडून जाणून घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

सरकारची केवळ जुमलेबाजी

या सरकारकडे देण्यासारखं काहीही नाही. ते फक्त जुमलेबाजी करीत असून जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा. शिवसेना तुम्हाला यासाठी पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपचे राजू शिंदे यांनी बांधले शिवबंधन

संभाजीनगरमधील भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपसह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश