महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

नवशक्ती Web Desk

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डाॅ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. मनोहर यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन केले आहे. समाजातील नाकारलेल्या माणसांच्या जगण्यातला उद्वेग, आशय - अभिव्यक्ती मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या १९७७ साली प्रकाशित झालेल्या ‘उत्थान गुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहाची वाङ्मयजगतामध्ये विशेष दखल घेतली गेली. त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टीकोन आणि संविधानातील मूल्यजागर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी डाॅ. यशवंत मनोहर यांचे अभिनंदन केले आहे.

स्व. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' देण्यात येतो.

या पुरस्काराची सुरुवात १९९० पासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त