डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा  प्रातिनिधिक छायाचित्रप्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११८ प्रशिक्षित डॉक्टरांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वेतनाअभावी घरभाडे भरणे आणि जेवणाची व्यवस्था करणेही कठीण झाल्याने संतप्त डॉक्टरांनी महाविद्यालयासमोर कामबंद आंदोलन केले.

Swapnil S

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११८ प्रशिक्षित डॉक्टरांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वेतनाअभावी घरभाडे भरणे आणि जेवणाची व्यवस्था करणेही कठीण झाल्याने संतप्त डॉक्टरांनी महाविद्यालयासमोर कामबंद आंदोलन केले. अखेर अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांनी मध्यस्थी करून थकीत वेतन लवकर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला.

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे डॉक्टर १२ ते २४ तास रुग्णसेवा देतात. शासनाच्या वतीने 'जेम्स मॅक्स' या संस्थेमार्फत त्यांना वेतन दिले जाते. मात्र, दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रुग्णालय परिसरात राहणाऱ्या डॉक्टरांना घरभाडे आणि जेवणाचा खर्च भागवताना अडचणी येत आहेत. मेस चालकाचेही पैसे थकल्याने जेवण मिळणे कठीण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

राज्यातील अन्य वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रशिक्षित डॉक्टरांना नियमित वेतन मिळत असताना सिंधुदुर्गातील डॉक्टरांवरच अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भविष्यात वेतन वेळेवर न मिळाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महाविद्यालयातील वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांचेही वेतन थकल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.'च्या माध्यमातून कार्यरत कर्मचाऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिष्ठात्यांना निवेदन दिले.

स्थानिक कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक

वेतनाअभावी घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि बँकेचे हप्ते भरण्यात अडचणी येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करावे आणि वेतन देण्याबाबत निश्चित कालमर्यादेसह लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. स्थानिक कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करू नये, असे त्यांनी सांगितले. वेतनाचा प्रश्न लवकर न सुटल्यास आंदोलन करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पुनर्विकासात उशीर केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेला ६.२० कोटींची भरपाई

कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज; झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज