महाराष्ट्र

समृध्दी महामार्गावरून एसटीचा सुसाट प्रवास ; नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार

देवांग भागवत

नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग तयार करण्यात आला आहे. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचे लोकार्पण केले. यानंतर या मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवार १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. यामध्ये प्रवाशांना ३० पुशबॅक पध्दतीची आसने असलेल्या एसटी मधून प्रवास करता येणार आहे. यामुळे समृध्दी महामार्गावरून एसटी देखील सुसाट धावणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा टप्पा ५७० किलोमीटरचा असून समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे. नुकतेच या महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर या मार्गावर प्रवाशांसाठी एसटी वाहतूक देखील सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल व पहाटे ५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे.

७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार

या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १००% मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) शयन आसनी बससेवा देखील सूरू

याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती