नवी दिल्ली : ‘नीट-पीजी २०२५’ची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’चा (एनबीई) निर्णय हा मनमानी आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे आदेश शुक्रवारी ‘एनबीई’ला दिले. मागील काही वर्षांपासून ‘नीट पीजी’सारखी परीक्षा दोन वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जात होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सुप्रीम कोर्टाने ‘एनबीई’ला निर्देश देताने म्हटले आहे की, बोर्डाने पारदर्शकपणे परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याची व्यवस्था करावी. १५ जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अद्यापही वेळ आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल, असे कोर्टाने सांगितले. जरी परीक्षा मंडळाने अधिक केंद्रांचा संदर्भ दिला तरी त्याला अधिक वेळ लागू शकतो. ज्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो. परिणामी, केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत, असा प्रतिवादींच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला तो युक्तिवादही फेटाळण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
मागील काही वर्षांपासून ‘नीट पीजी’ची परीक्षा दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतल्या जात होत्या, मात्र सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची कठीण पातळी पूर्णपणे समान मानता येत नाही. ही परिस्थिती असमानता आणि मनमानी निर्माण करते. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एकाच टप्प्यात परीक्षा घेणे आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारख्याच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात, ज्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते.
२२ मे रोजी निर्देश जारी
दरम्यान, ‘नीट पीजी २०२४’च्या परीक्षेत पारदर्शकतेची मागणी करत विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. कारण दोन टप्प्यात परीक्षा घेणे असमानता आहे. त्याशिवाय परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली. ज्यामुळे निकालाचे आकलन आणि सुधारणा करता येईल. सुप्रीम कोर्टाने २२ मे रोजी सर्व खासगी आणि अनुदानित मेडिकल विद्यापीठांना त्यांचे ‘फी डिटेल्स’ सार्वजनिक करण्याचे निर्देश देत परीक्षेत पारदर्शकता आणण्यास सांगितले होते.
१५ जूनला परीक्षा
‘नीट पीजी २०२५’ची परीक्षा वेळापत्रकानुसार १५ जूनला आहे. याआधी परीक्षा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बोर्डाला नव्याने परीक्षा कार्यक्रम जारी करावा लागणार आहे.