महाराष्ट्र

मुख्य सचिवांच्या बदलीचे वारे! सुजाता सौनिक यांच्या जागी चहल यांची वर्णी?

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांनी जेमतेम महिनाभरापूर्वी जबाबदारी स्वीकारली. महिना पूर्ण होण्याआधीच सौनिक यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांनी जेमतेम महिनाभरापूर्वी जबाबदारी स्वीकारली. महिना पूर्ण होण्याआधीच सौनिक यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे, सौनिक यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधी त्यांच्या बदलीच्या हालचालींना वेग आला असून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची मुख्य सचिवपदी वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेटिंग लावली आहे का, असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर महायुतीला विचारला आहे. दरम्यान, सुजाता सौनिक यांना विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनीही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. “कोणत्याही गोष्टीसाठी एक मर्यादा असते, मात्र आता कृती करण्याची वेळ आली आहे,” असा इशारा राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी दिला आहे.

महिलांवरील अत्याचारात विरोधात राज्यात संताप व्यक्त केला जात असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर सुजाता सौनिक यांच्या बदलीच्या हालचाली झाल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.‌ इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जाते.‌ चहल यांच्यासाठी ‘मित्रा’ने (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) पुढाकार घेतला असून सौनिक यांनी स्वत: पदावरून बाजूला व्हावे, असा निरोप पाठवल्याचे समजते. या बदल्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाची ऑफर सुजाता सौनिक यांना देण्यात आल्याची चर्चा आहे.

स्त्रियांना दुर्बळ आणि कमी सक्षम मानणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याविषयी राष्ट्रपती मुर्मू यांनी भाष्य केले. मात्र दुसरीकडे, महाराष्ट्रातील सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याचे समजते. महाराष्ट्र लुटण्यासाठी भाजपला मदत व्हावी, त्यासाठी पसंतीच्या व्यक्तीला त्या पदावर नियुक्त करण्याचा घाट सुरू असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर केला आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी