महाराष्ट्र

ठाकरे गट २३ जागा लढविणार ;संजय राऊत यांचा दावा : महायुतीत वादाची चिन्हे

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राऊत यांचा दावा फेटाळला आहे. कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महाराष्ट्रात २३ जागा लढविणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी  केला आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत स्पष्ट सांगितले असून जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात नव्हे, तर हायकमांडसोबत होईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, राऊत यांचा दावा काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होण्याआधीच राऊत यांनी आपला पक्ष किती जागा लढवणार हे जाहीर करून टाकल्याने आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेत्यांकडून जागावाटपाबाबत विविध दावे केले जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, ‘‘काँग्रेसने महाराष्ट्रातील ४८ जागा लढवाव्यात, त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. ती बातमी कोणी दिली माहीत नाही, पण आमची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बैठक झाली. कदाचित यासंदर्भात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहीत नसावे. उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत होते, तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत अर्धा तास महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. यावेळी आपण स्वत: व आदित्य ठाकरेही उपस्थित होतो. या चर्चेत काय घडले, हे आम्हालाच माहीत आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडसोबत होईल. आम्ही २३ जागा लढवत आहोत, हे आम्ही दिल्लीच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले असल्याचे राऊत म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी व इंडियाचे घटक पक्ष असावेत, यासंदर्भात दिल्लीत आमची सविस्तर चर्चा झाली असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली.

काँग्रेसने दावा फेटाळला

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राऊत यांचा दावा फेटाळला आहे. कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. ज्याची जिथे ताकद आहे तो पक्ष ती जागा लढवेल. जागावाटपाबाबतचा निर्णय हायकमांडच घेतील. त्यामुळे संख्येचा प्रश्न आला कुठे, असा सवाल करत काहीतरी वावड्या उठवून आपापसांत भांडणं लावण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक