शहापूर : शहापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही मागणी गेली ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. तालुक्यातील बौद्ध समाजाकडून ही मागणी होत असताना देखील अजूनपर्यंत प्रलंबित असल्याने गेल्या चार दिवसांपासून रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती व सत्यकाम भगवान गायकवाड हे दाम्पत्य आपले घर सोडून आपला संसार शहापूर तहसील कार्यालयाच्या मैदानात थाटून प्रशासनाचा निषेध व्यक्त करित आहेत. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मंजूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शासनाच्या प्रतिनिधींना सांगत बुधवारी सायंकाळी आंदोलन सोडण्यास नकार दिला.
सोमवार ५ फेब्रुवारीपासून ब्रिगेडच्या वतीने शेकडो बौद्ध बांधवांसोबत बस स्टँडपासून मोर्चा काढत संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी हे अभिनव आंदोलन सुरू केले. घरातील भांडी, कपडे घेऊन तहसील कार्यालयाच्या मैदानातच मागील चार दिवसांपासून गायकवाड दाम्पत्य येथे आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्याकडून शहापूर बाजारपेठेतील अंबिका माता मंदिर येथे असलेल्या स्मारकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याची मागणी केली; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हा स्मारक रस्ता मार्जिनमध्ये येत असल्याने विरोध केला. त्यामुळे शहापूर नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायतची आरक्षित जागा, शासकीय कार्यालये येथील जागांची पाहणी करून यामध्ये एखादी जागेची मागणी यावेळी गायकवाड दाम्पत्य यांनी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडे केली.