महाराष्ट्र

"त्यांची वरपासून खालपर्यंत..." शिवसेनेच्या वर्धापनदिनी कडाडले उद्धव ठाकरे , नेमकं काय म्हणाले?

Suraj Sakunde

शिवसेना ठाकरे गटानं आज पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन साजरा केला. षण्मुखानंद सभागृहात यानिमित्तानं मोठा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षानं सर्व नवनिर्वाचित खासदारांचा त्याचबरोबर पराभूत आमदारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांना स्पर्श केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, शहरी आतंकवाद, विधानसभा निवडणूका आदी विषयांवर भाष्य केलं.

विजयाचे मानकरी शिवसैनिक...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलं. विजयाचं श्रेय मला दिलं. पण या मानकरी तुम्ही आहात. शिवसेनाप्रमुखानी मला सांगितलं होतं. आत्मविश्वास आणि अहंकारामध्ये फरक आहे. हा अहंकार मोदींमध्ये आहे."

ठाकरे पुढे म्हणाले की,"भाजपला निवडणूकीत तडाखा बसलाय. म्हणून त्यांनी निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरु केली. ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, मातेसमान शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांसोबत पुन्हा जायचं? ते गैरसमज पसरवून अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची वरपासनं खालपर्यंत फाटलीये..

हे सरकार चालेल असं मला वाटत नाही...

"मी आज विजयी उमेदवारांचा सत्कार केला, त्याचप्रमाणे पराभूत झालेल्या योद्ध्यांचाही सत्कार केला. कारण जर मध्यावधी निवडणूक लागली, तर तुम्ही पुढचे खासदार होणार आहात. हे सरकार चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार पडलंच पाहिजे, पुन्हा निवडणूका झाल्याच पाहिजे. नाहीतर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो," असं ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं...

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला, ते म्हणाले की, "आमच्यावर आरोप केला जातो. शिवसेनेला मराठी मतं पडली नाहीत. हिंदू मतं पडली नाहीत. मुस्लिम मतं पडली. हो पडलीत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला पडली आहेत. त्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सारेच आले. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, का तर आम्ही काँग्रेससोबत गेलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. तुम्ही २०१४, २०१९ चा एनडीएचा फोटो पाहा आणि २०२४ चा पाहा. आज त्यांच्यासोबत जे चंद्राबाबू आणि नितीश कुमार बसलेत, ते हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आश्वासनं दिलीच आहेत. आमच्याकडे चोरीमारी नाहीये. मुस्लिम समाजाला माहितीये, आम्ही वार केले तर समोरून करू, यांच्यासारखे पाठीमागून नाही."

तर मी आतंकवादी आहे...

"काही पत्रकारांनी आम्हाला मतदान करा म्हणून प्रचार केला, तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणाले. लोकशाही वाचवणं हा आतंकवाद असेल, तर मी आतंकवाद आहे. देशाचं संविधान वाचवणं हा आतंकवाद असेल, तर मी आतंकवादी आहे. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसलेत मोदी आणि शहा, ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स पाठवता. हा तुमचा नक्षलवाद नाहीतर काय आहे. चांगली सरकार चाललेली पाडायची आणि नंतर त्यांना सोबत घेऊन मंत्रीपदं द्यायची, ही लोकशाहीची हत्या आहे. हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक प्रकार आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. तुमचं कर्तृत्व लोकांनी बघितलं आहे. त्यामुळं एवढं होऊनही जनतेनं आम्हाला मतदान केलं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

षंढ नसाल तर, लढून दाखवा...

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींना आव्हान देत ठाकरे म्हणाले की, "जर तुम्ही षंढ नसाल, तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न वापरता, धनुष्यबाण चिन्ह न घेता, शिवसेनेचं नाव न लावता माझ्यासमोर लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे की, यावेळी आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचा फोटो वापरला नाही आणि यापुढं देखील वापरणार नाही. मोदीजी, मी तुम्हाला आव्हान देतोय. विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच महाराष्ट्रात सुरु करा. फक्त या षंढांना बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचं, धनुष्यबाण लावायचं नाही. नवं नाव घ्या. मिंध्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर...माझ्या वडिलांचा फोटो लावून स्टाईकरेट सांगताय तुम्ही..."

राज ठाकरेंवर बोचरी टीका...

बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की,"एक गोष्ट बरी झाली. या निवडणूकीमुळं आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं. काही जणांना फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट ना? आम्ही नाटकं करणारी माणसं नाही. ती कला मोदींना जमते, आम्हाला नाही. महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात नाही, दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती. रोज यांचे सालटी काढली असतं मी."

त्यांनी भगव्यामध्ये भेद केला...

"मी नम्र आहे. तुम्ही प्रेमानं वागा, आम्हीही प्रेमानं वागू. पण तुम्ही पाठीत वार कराल, तर आम्ही वाघनखं काढू. आता मुनगंटीवार ज्यांची नखं उपटलीत चंद्रपूरमध्ये, ते लंडनध्ये पुन्हा वाघनखं आणायला चाललेत. अहो कशाला तुम्ही त्या छत्रपतींचा अपमान करताय. एकतर तुमची पात्रता नाही. गद्दार मानसिकतेचे तुम्ही. भगव्याशी गद्दारी करणारे तुम्ही. भगव्याशी बेईमानी करणारी औलाद तुमची. छत्रपतींच्या भगव्यावर कोणतंही चिन्ह नव्हतं, पण भगव्यामध्ये भेद केला. याचं चिन्ह छापा, त्याचं चिन्ह छापा. म्हणून आपल्या भगव्या झेंड्यावर आपलं चिन्ह टाकायचं नाही. आपला भगवा शिवरायांचा पवित्र भगवा आहे. तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा. छत्रपतींच्या भगव्याला त्यांनी जो कलंक लावलाय, त्याला आपल्याला गाढायचंय. म्हणून भगव्यावर कोणतंही चिन्ह टाकू नका," असं ठाकरे म्हणाले.

ही लढाई संविधानाची...

"आता विधानपरिषदेच्या निवडणूका आल्यात, मुंबईच्या दोन्ही आणि नाशिक शिक्षक निवडणूक आपल्याला जिंकायचीय. लढाई सुरु झाली आहे. आता थांबून चालणार नाही. यासोबतच विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणूकीची घोषणा झालीये. ज्या आमदारांच्या मतांवर निवडून येणार आहेत. माझी सुप्रीम कोर्टाला विनंती आहे, की तुम्ही अपात्रतेचा निर्णय खोळंबून ठेवला आहे. तुम्ही शिवसेनेच्या ४० आणि राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला तर ही निवडणूक होऊ शकेल का? यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक कशी होऊ शकते? निवडणूक प्रक्रिया सुरु केलीच कशी? ही लढाई संविधानाची. जनतेच्या न्यायालयातील लढाई आम्ही जिंकलो. जनतेनं त्यांचं काम केलं. तुम्ही तुमचं काम करणार की नाही? किती काळ वाट पाहायची? म्हणून मी म्हटलं हे सरकार पडलंच पाहिजे," असं ठाकरे म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस